भाजप महायुतीला लाडक्या बहिणींचा आशीर्वाद
schedule23 Nov 24 person by visibility 68 categoryराजकीय
मुंबई : महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांचे निकाल जाहीर झाले असून सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या अपेक्षेपेक्षा महाविकास आघाडीने अत्यंत कमी जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजूने स्पष्ट दिसत आहे.
जुलै महिन्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा ₹1,500 ची मदत देण्यात येत आहे.
राज्यात साधारणतः 2 कोटी महिला या योजनेच्या लाभार्थी ठरल्या असून, निवडणुकीपर्यंत या महिलांच्या बँक खात्यात ₹7,500 जमा करण्यात आले आहेत. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना प्रभावी ठरल्याचे दिसते.
विरोधकांनी या योजनेवर टीका करत सत्ताधाऱ्यांवर निवडणुकीपूर्वी मतं विकत घेण्याचा आरोप केला. मात्र, या योजनेमुळे महिलांमध्ये महायुती सरकारबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेने महायुतीला ग्रामीण व शहरी भागात मोठा पाठिंबा मिळवून दिला आहे. विशेषतः महिला मतदारांच्या मतदानाच्या आकडेवारीतून या योजनेचा स्पष्ट प्रभाव दिसत आहे.