घोडावत विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरु
schedule29 Aug 24 person by visibility 93 categoryशैक्षणिक
संजय घोडावत विद्यापीठ आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमबीए आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू केला आहे. यामुळे करिअरच्या अनेक संधी खुल्या होणार असल्याची माहिती कुलगुरू प्रो. उद्धव भोसले यांनी दिली. सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य, आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य, आर्थिक पुनप्राप्ती, आणि नेतृत्वाच्या क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल.
कुलगुरू प्रो. भोसले यांनी सांगितले की, हा अभ्यासक्रम ब्रिटिश कौन्सिलच्या 'गोइंग ग्लोबल पार्टनरशिप ग्रांट' द्वारे निधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सवलतीच्या शुल्कात उपलब्ध होईल. तसेच, हा अभ्यासक्रम भारत सरकारच्या आपत्ती-लवचिक पायाभूत सुविधा गठबंधन ने मंजूर केला आहे. सरकारी कार्यालये, संबंधित उद्योग तज्ञ आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांनी या अभ्यासक्रमाला पाठिंबा दिला आहे. युजेसीच्या नवीन धोरणांनुसार, हा अभ्यासक्रम इतर नियमित पीजी किंवा पीएचडी अभ्यासक्रमासोबत एकाच वेळी करता येईल.
याचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना इंग्लंड मधील टीसाईड विद्यापीठात किंवा भारतातील सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी संस्थांमध्ये संपूर्ण सेमिस्टर इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, घोडावत विद्यापीठाने या अभ्यासक्रमाचे वेळापत्रक लवचिक ठेवले असून, हायब्रिड शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. आठवड्याच्या शेवटी अभ्याससत्रे आयोजित केली जातील, ज्यामुळे विद्यार्थी आपल्या नियमित कामकाजाबरोबर हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतील. हा अभ्यासक्रम एनइपी 2020 नुसार बनवण्यात आला आहे .यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा सरकारी, निमसरकारी, खाजगी किंवा इतर कोणत्याही संस्थेमध्ये कार्यरत असणारे व्यावसायिक प्रवेश घेऊ शकतात.
अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी अभ्यासक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.कुलसचिव विवेक कायंदे यांनी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवाहन केले आहे.
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)