शासकीय निवासी शाळेत मोफत प्रवेश सुरु
schedule13 Jun 24 person by visibility 99 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयात सहायक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर या कार्यालयाच्या अधिनस्त अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, राधानगरी, गगनबावडा, शिरोळ व मसूदमाले ता. पन्हाळा या ४ शासकीय निवासी शाळा कार्यरत असून इ. ६ वी ते इयत्ता १० साठी मोफत प्रवेश देण्यात येत आहे. सन २०२४-२५ या वर्षाकरीता इ. ६ वी ते इ.१० वी करीता प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाईन पध्दतीने (मॅन्युअली) असून गरजू विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह संबंधित निवासी शाळेचे मुख्याध्यापक, गृहपाल यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांना निवासी शाळेत रिक्त जागेनुसार आरक्षणनिहाय, गुणवत्तेनुसार नियमांच्या अधिन राहून प्रवेश देण्यात येणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती ८० टक्के अनुसूचित जमाती १० टक्के विमुक्त जाती भटक्या जमाती ५ टक्के दिव्यांग ३ टक्के विशेष मागास प्रवर्ग २ टक्के अशी प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
निवासी शाळेमधील प्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेष, अध्यायन, अध्यापन मोफत शैक्षणिक साहित्य, सुविधा, सकाळचा नाष्टा, दोन्ही वेळेचे जेवण व राहण्याची सोय, गरम पाण्याची सोय, वाय-फाय सुविधा, स्वतंत्र प्रयोग शाळा, पिण्यासाठी शुध्द पाणी, ग्रंथालय व ई लायब्ररी सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्य सर्व डिजीटल क्लास रुम, अभ्यासिका, निर्वाह भत्ता, मनोरंजन कक्ष, क्रिडा साहित्य व अत्याधुनिक जीम, सीसीटीव्ही निगराणीत सुरक्षित वातावरण, इ. प्रकारच्या सोयी विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात. विदयार्थ्यांना वसतिगृहात रिक्त जागेनुसार आरक्षणनिहाय, गुणवत्तेनुसार नियमांच्या अधिन राहुन प्रवेश देण्यात येतो.
जास्तीत जास्त इच्छूक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित निवासी शाळेचे मुख्याध्यापक, गृहपाल आणि सहायक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर विचारे माळ, बाबर हॉस्पीटल जवळ, कोल्हापूर येथे समक्ष किवा दूरध्वनी क्र.०२३१-२६५१३२८ संपर्क साधावा, असे आवाहनही. श्री. साळे यांनी केले आहे.