Maha Hit 24
Register

जाहिरात

 

मतदान ओळखपत्राशिवाय इतर १२ प्रकारची ओळखपत्रे ग्राह्य

schedule19 Nov 24 person by visibility 365 categoryराजकीय

कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून मतदान करण्यासाठी ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्यासाठी मा. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार छायाचित्र ओळखपत्रा व्यतिरीक्त (EPIC) इतर 12 प्रकारच्या ओळखीच्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे. मात्र, संबंधिताचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. मतदारांनी आयोगाच्या निर्देशांपैकी कोणताही एक पुरावा दाखवून विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.*
 
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, असे मतदार त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरीक्त पुढील 12 कागदपत्रांपैकी कोणताही एक पुरावा सादर करू शकतील. 
 
          मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र नसल्यास 12 प्रकारच्या पुराव्यांमध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes