Maha Hit 24
Register

जाहिरात

 

अमेरिकन कल्चर आणि भारतीय संस्कृती

schedule10 Jul 24 person by visibility 263 categoryसंपादकीय

पंढरीची वारी करण्याचा कधी योग आला नाही. पण आमची दोन्ही मुलं अमेरिकेत असल्याने, ९८सालापासून ते आतापर्यंत सुमारे २२वर्षे अमेरिका वारी चालू आहे. त्यामुळे तिथलं हवामान, राहणीमान, जीवनमान यांचं फार जवळून दर्शन घडले. आणि तेव्हांपासून ते आतापर्यंत जे दिसलं, पाहिलं, अनुभवलं ते सारं फारच विलक्षण होतं. नाविन्यपूर्ण तर होतंच, सुंदरही होतंच, विस्मयकारीही होतं. पण थोडंसं धक्क्दायकही आणि जरासं खटकणारंही होतं. फारचवेगळं. कधी कल्पनाही करू शकणार नाही असं. जग असंही असू शकतं हे कळलं. 

आता खूप काळ लोटला. वैन्यानिक, सामाजिक सर्वच क्षेत्रात, विशेषतः तंत्रद्न्याने प्रचंड झेप घेतली आहे. विविध माध्यमांमुळे जग लहान झालंय, अगदी जवळ आलंय. आपल्याकडेही अगदी दूरवर, लहान - सहान खेड्यापर्यंत नवीन ज्ञान पोचलेलं आहे. २२ वर्षांपूर्वीचा अमेरिकेचा नवीन अनुभव आणि आताचा अनुभव याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्याचं काय आहे की, मुळातच अमेरिकन संस्कृती आणि आपली भारतीय संस्कृती अतिशय भिन्न आहे. अगदी दोन टोकं. प्रचंड फरक. कारणंही तशीच. एकतर आपल्याकडे जेव्हां दिवस तेव्हां तिथे रात्र. आणि तिथे दिवस तेव्हां आपल्याकडे रात्र. इथूनच मुळी सगळं उलट. विरुद्ध. भौगोलिकदृष्ट्या आणि हवामानानुसारसुद्धा. म्हणून लाईफ स्टाईलही अगदी वेगळी. आपल्याकडे लोकसंख्या प्रचंड. हाच मोठा प्रॉब्लेम. त्यामुळे सोयीसुविधा, शिस्त, स्वच्छता याबाबतीत आपण त्यांच्या तुलनेत जरा डावेच. कर्मकांड, अंधश्रद्धा, बुवाबाजी यात जास्त गुरफटलेले. विशेषेकरून खेड्यापाड्यात. 

त्यामानाने मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरातून मात्र विचारसरणी बरीचशी बदलेली, सुधारलेली दिसते. हा थोडा शिक्षणाचा प्रभाव असावा. अमेरिकेत थंडीचा सिझन मोठा. म्हणूनही असेल कदाचित. तिथे आंघोळी बहुतेक रात्रीच. ८-८ दिवसांचे कपडे साठवून, विकएंडला सगळे ओकदम धुवायचे. वॉशिंग मशीन सोबत ड्रायरही असतो. त्यातूनच कपडे वाळूनही निघतात. ते थोडे गरमही असतात. आम्हाला हे सगळं फारच नवीन होतं, मजेशीर होतं. विचित्रही होतं. कपडे दोरीवर वाळत घालण्याची पद्धत नाही. आपल्याकडे कसे पावसाळ्यात घरात जागा मिळेल तिथं खुर्चीवर, टेबलवर कपडे वाळवण्यासाठी घातले जातात. एकतर जागा लहान दमट हवामान. तसंच घरात माणसंही खूप. तिथे भांडी धुण्यासाठी डिशवॉशर, आम्ही तो कधी पाहिलाही नव्हता. आता आपल्याकडेही तो आला आहे असं म्हणतात. अमेरिकेत भांडी धुण्याचं काम बहुतेक पुरूष मंडळींचं करतात एक विशेष सांगण्यासारखी बाब म्हणजे अमेरिकेत सगळी कामं बहुतेक स्त्रिया आणि पुरूष दोघेही करतात. तिथे थंड हवामानामुळे, जमिनीवर सगळीकडे बहुतेक कार्पेट्सच असतात. हवामान स्वच्छ. धूळ नाही. म्हणून केर रोज काढला नाही तरी चालतो.. त्यामुळे आठवड्यातून ओकदा व्हॅकुम केलं जातं. तिथे अशावेळी कामासाठी कामवाली नसते. कारण ते परवडणारं नसतं.

एक गोष्ट मात्र नक्की आणि चांगली ती म्हणजे- आपल्याकडे हवामान उष्ण असल्याने घरं बहुतेक उघडी ठेवलेली असतात. मोकळ्या हवेमुळे आपली मुलं बहुतेक बाहेरच, मातीत खेळत असतात. त्यामुळेही असेल. अमेरिकनांच्या तुलनेत आपली प्रतिकारशक्ती जास्त असते. म्हणून आपल्या मुलांना चटकन कोणतंही इन्फेक्षन होत नाही. लहान मुलांना सर्दी खोकला होणं। नित्याचीच बाब असते. त्याचा कांही आपण एवढा बाऊ करत नाही कारण ती आपोआप बरी होते ही आपली मनाची धारणा बव्हंशी ते खरंही आहे. पण अमेरिकेत जर का लहान मुलांना सर्दी झाली की-बापरे! ईयर इन्फेक्षन, थ्रोट इन्फेक्शन असे मोटे मोठे शब्द वापरून घाबरवून सोडतात, त्याचं हेही एक कारण असू शकतं की, तिथे आपल्याकडच्या सारखे डॉक्टर सहज उपलब्ध नसतात म्हणूनही काळजीपोटी, तिथे स्वच्छतेचा अतिरेक केला जातो. आपण कसे ऊठसूट बारीक सारीक गोष्टीसाठी डॉक्टरकडे धावतो. अमेरिकेत कडाक्याची थंडी. त्यामुळे २४ तास दारं खिडक्या बंद. मोकळी हवा फारशी मिळतच नाही. त्यामुळे लहान बाळांना सारखी वेगवेगळ्या प्रकारची अॅलर्जी असते. नट्सची अॅलर्जी म्हणजे शेंगदाणे, काजू, बदाम यांची, तर दुधाची आणि गव्हाचीसुद्धा असते हे ऐकून तर मी अवाकच झाले. म्हणून स्वच्छता, संगोपन याचा खूप अतिरेक. त्यामुळेसुद्धा रोगप्रतिकारकशक्ती कमी होते असं मी कुठेतरी वाचलंय. Over cleanliness and over protection leads to Allergy असं म्हणतात. हे सगळे जरी खरं असलं तरी, त्यामानानं आपल्याकडे खेड्यापाढ्यात म्हणा किंवा हा स्पिटलमधे विशेषेकरून सरकारी दवाखान्यात स्वच्छता जरा कमीच असते. हायजिनबाबतीतसुद्दा जरा कमीच. 

अमेरिकेतून भारतात आल्यावर हे जरा जास्तच जाणवतं. या पार्श्वभूमीवर आपले मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींजींनी स्वच्छता अभियान सुरू केलंय आणि ते मोठ्या प्रमाणावर राबवलं जातंय. हे स्वागतार्ह आहे. अमेरिकेतली आणखी एक खटकणारी गोष्ट म्हणजे अगदी तान्ह्या बाळांना वेगळ्या खोलीत झोपवतात आईजवळ नाही. हे सगळं आपल्या कल्पने पलिकडचं आहे. बाळ नेहमी आईच्या जवळ असतं. आईच्या कुशीत मायेची ऊब असते असे हे आपले संस्कार. तिथे बाळासाठी झुलणारा पाळणा नाही. जो असतो तो एक छोटा लाकडी पलंगच, चोहो बाजूंनी बंद. वरून मात्र मोकळा. छत नसलेला असा त्याला CRIB म्हणतात.. मूल रडलं की कळावं म्हणून त्याच्या खोलीत एक सेन्सिटिव्ह अलार्म असतो. जे जे ऐकावं, पहावं ते ते नवलच. आपल्याकडे बाळंतपण आणि बाळ. म्हणजे एक सोहळाच असतो. उत्सव असतो आनंदाचा. दोघांना गरम तेलानं मसाज, आंघोळ, बाळंतिणीला ताजं, गरम जेवण, डिंक लाडू, अळीव लाडू, मेथीलाडू असा पौष्टिक आहार. पण अमेरिकेत कडाक्याच्या थंडीतसुद्धा फ्रीजमधला गार ज्यूस, आईस्क्रीम, कसलं तरी गारढोण खाणं देतात. त्यांची नांवंही कळत नाहीत आपल्याला. एकावं, पहावं ते एकेक आक्रितच. खरंतर थंडीत त्यांनाच तेलाचा मसाज, गरम अन्नाची गरज आहे अशी आपली माझी भाबडी समजूत. छोट्या बाळांसाठी डायपर वापरतात, हे २२ वर्षांपूर्वी आमच्यासाठी नवीन होतं. उबदारपणासाठी मात्र ते तिथं गरजेचं असतं. त्यामुळे कपडेही घाण होत नाहीत, सारखे बदलावे लागत नाहीत. आपल्याकडेही हल्ली याचा वापर होतो आहे. आधुनिक काळानुरूप ते योग्यही आहे. पण उष्ण हवामानामुळे आपण त्याचा खूपसा वापर करत नाही. कारण ते घासले जाऊन रॅश उठते. अमेरिकेत सगळं दूरदूर असल्याने फोर व्हीलर मस्टच. त्यात बाळासाठी कार-सीट असते. सेफटीसाठी तिला बेल्टही असतात. सीटच्या जवळच्या दाराला चाईल्ड लॉक असते. त्यामुळे ते चटकन उघडले जात नाही. शिवाय सीटची रचना अशी असते की, बाळाचं तोंड, शेजारी बसलेल्या आईच्यासमोर असतं. कारण जर कारला धडक बसली तर, मूल समोर आपटलं जाऊ नये म्हणून. अमेरिकेत प्रत्येक बाबतीत सुरक्शितता मात्र जाणीवपूर्वक जोपासली जाते. ही एक मुद्दाम उल्लेख करण्याजोगी बाब. ड्रायव्हिंग करताना, जिथे जायचंय तिथला मार्ग दाखविण्यासाठी, ड्रायव्हरच्या समोरच G.P.S. असतं. म्हणजेच मार्गदर्शिका. तिच्यातून सारख्या सूचना येत असतात. उजवीकडे वळा, डावीकडे वळा, अमुक रस्त्या वर ट्रॅफिक जाम आहे, अॅक्सिडेंट झाला आहे इ.इ. त्या वेळी, आमच्यासाठी हे नवीन न्यान होतं.. पण तेव्हां त्याची खूप गंमतही वाटली होती. हल्ली आपल्याकडेही G.P.S. आहे.

आणखी एक नवल म्हणजे, आपल्याकडे टेबल म्हणा, खुर्ची, कपाट जे कांही हवं असेल ते तयार मिळतं. पण तिथं मात्र अशा गोष्टींचे पार्ट्स-त्यांच्या नावासहित, ते कसे फिक्स करायचे या माहितीसहित सर्व साहित्य दुकानात उपलब्ध असतं. ते घरी आणून आपणच असेंबल करायच. त्यासाठीकोणी माणूस बोलावत नाहीत. कारण ते परवडत नाही. अशी कामे किंवा रिपेअर करणार्याना Handy man म्हणतात. कांही का असेना, पण मला हे पाहून आनंद याचा वाटला की, आपली मुलं भारतात कांही अशी कामं करणार नाहीत. पण अमेरिकेत मात्र आवडीनं करतात नाईलाजच असतो ना? अगदी भांडी घासणं, कपडे धुणे, व्हॅकुम करणे, स्वयंपाकात मदत करणे, बाळाला आंघोळ घालणे, डायपर बदलणे अशी सगळीसगळी कामं करतात. कारण त्यांच्या बायकाही खूप शिकलेल्या असतात, बरोबरीने नोकर्याही करतात. मग त्यांना मदत करायलाच हवी ना? आपल्याकडे कामाला माणसंही मिळतात. तिथे तशी पद्धतही नाही म्हणा किंवा लेबर खूप महागही असतं.

शिक्षणाच्या बाबतीत मात्र अमेरिकेत वेगळीच परिस्थिती आहे. सर्वसाधारणपणे बरीचशी माणसं जुजबी शिक्षण घेतात आणि छोटीमोठी कामं करून पैसे कमावतात. कोणतिही, कितीही कष्टाची कामं करण्याची त्यांची तयारी असते. त्यात कमीपणा मानत नाहीत. रोजच्या चैनीपुरते पैसे मिळवले की झालं पैसे साठवणं वगैरे गोष्टी जरा दुय्य्मच श्रमप्रतिष्ठा हा त्यांचा गुण मात्र अगदी घेण्यासारखा आहे.. जे लोक शिक्षण घेतात ते मात्र उच्च शिक्षण घेतात. अमेरिका विकसित राष्ट्र असल्याने, कामगार, श्र मिक अशा सर्व स्तरावर रोजचं जेवण स्वस्त असतं. त्यामुळे तिथले कामगार अगदी धट्टेकट्टे, उंच, धिप्पाड, सशक्त असतात- पहिलवानासारखे खाऊन पिऊन मस्त मजेत, आनंदात असतात. आपल्याकडे कष्टकरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे-पोट खपाटीला गेलेले, हडकुळे, दारिद्र्याने गांजलेले, गरीब बिच्चारे असे. खूप वाईट वाटतं त्यांच्याकडे बघून. अमेरिकेचं आणखी एक वेगळं कल्चर म्हणजे मुलं १८ वर्षाची झाली की, घरा बाहेर पडतात. मग ती स्वतंत्र मग शिक्षण घ्या न घ्या. तुमचं आयुष्य तुम्हीच घडवायचं. अशी तिथली संस्कृती. आणि आपल्याकडे आई बाप कितीही गरीब असोत, काबाडकष्ट करून, हाडांची काडं करून, मुलांना शिक्षण देण्यासाठी जीवाचं रान करतात. हा दोन्ही संस्कृतीतला फरक. आता काय चुकीचं आणि काय बरोबर, हा ज्याचा त्याचा प्रश्न. अमेरिकेत शाळेत जाणारी आपली भारतीय मुलं मात्र खूप competitive, असतात. खूप हुशार, अभ्यासू असतात. त्यांनी शिकून खूप मोठं व्हावं यासाठी त्यांचे आई-बाबा खूप प्रयत्नशील असतात. तिथे मुलं १८व्या वर्षीच घराबाहेर पडतात. त्यानंतर आईवडील, भावंडं, एकत्र राहतच नाहीत. एकत्र कुटुंब पद्धती ही संकल्पनाच तिथं नाही. त्यामुळे वर्षातून एकदा Mother's Day-Father's Day, साजरा करतात. पार्त्या होतात. त्या दिवशी ते लोक आपल्या आईवडीलांना भेटतात. असे हे DAY, तिथेच पहिल्यांदा ऐकले. मला हे सगळं पचनी पडायला फारच कठीण गेलं. असं हे तिथं ओकदम टोकाचं व्यक्तिस्वातंत्र्य. आपली संस्कृती कशी? म्हातार्या आईवडिलांना सांभाळायचं, त्यांची काळजी घ्यायची अशी. पण आपल्याकडेही बदलत्या काळानुसार हे कमी होत चाललंय. संथ तेवणार्या नंदादीपासारख असणारं, जपलं जाणारं म्हातारपण हळूहळू इतिहासजमा होतंय. तरी अजूनही प्रत्येक भारतीयाच्या मनात, म्हातार्या आईबाबांना जपणे हे कुठेतरी मनाच्या खोल कप्प्यात दडलेलं असतंच. तो एक नाजूक, हळवा असा रेशीमबंध, मधूनच डोकं वर काढतंच असतो. अमेरिकेत गेल्यावर, मुलांना आपल्या आईबाबांना कायआणि किती दाखवू असं होऊन जातं. तिथल्या नाविन्यपूर्ण, आश्चर्यकारक, प्रेक्षणीय गोष्टी, WONDERS, जगप्रसिद्ध नायगारा धबधबा, गोल्डन ब्रिज, Grand canyon- पृथ्वीच्या उत्क्रांतीमुळे तयार झालेला हा भाग, Duke, Stamford, Berkley अशा जगविख्यात university, Mystery point, Beaches, Las vegas इत्यादी दाखवितांना त्यांना होणारा आनंद, त्यांच्या डोळ्यातून, त्याच्या प्रत्येक क्रुतीतून ओसंडून वाहत असतो. आणि हे सारं पाहून आपल्यालाही आपल्या मुलांचा सार्थ अभिमान वाटतो. कोणीही कांहीही म्हटलं तरी, त्यांनी चिकाटीनं, कष्टानं घेतलेलं उच्च शिक्षण, त्या जोरावर अमेरिकेत प्रस्थापित केलेलं स्वतःचं असं स्थान, उच्च पद, स्व कर्तुत्वावर मिळवलेलं अगदी डोळ्यात भरेल असं वैभव या गोष्टी नाकारता येणार नाहीत. आपल्या आईवडिलांनी केलेल्या कष्टाची त्यांनाही जाणीव असते. 

सौ. शैलजा स. धामणकर-निंबाळकर, १०, शिरगावकर कॉलनी, विष्णूनगरसमोर, राधानगरी रोड, कोल्हापूर.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes