Maha Hit 24
Register

जाहिरात

 

अमेरिकन कल्चर आणि भारतीय संस्कृती; भाग २

schedule17 Jul 24 person by visibility 149 categoryआंतरराष्ट्रीय

अमेरिकेत शिक्षणाव्यतिरिक्त खेळासारख्या इतर गोष्टींनाही खूप Exposure असतं, खूप महत्व दिलं जातं. Sky Diving (म्हणजे उडत्या विमानातून उडी मारणे), Scuba Diving (म्हणजे समुद्रात पाण्याखालून जाणे), Skating म्हणजे बर्फावरून घसरत घसरत कसरती करणे, अति दुर्गम अशा ठिकाणी गिर्यारोहण. असे अनेक प्रचंड साहसी खेळ, जे आपल्यासाठी नवीन आहेत त्याचं आपल्या मुलांना प्रचंड आकर्षण असतं. त्यांच्या तरूण सळसळत्या रक्तासाठी असे धाडसी खेळ खेळणं हे आव्हानात्मक असतं आणि ते, ते मनसोक्त एंजॉय करतात. अहो, SKY DIVING न्हणजे तर एक भयंकर खतरनाक खेळ आहे. उडत्या विमानातून पॅरॅशूटच्या सहाय्याने, हवेतून मुक्तपणे स्वतःला खाली झोकून देणे. तेही साधारणपणे ४००० मीटर उंचीवरून. ४० ते ५० सेकंद. आणि याला ते म्हणतात-An Exciting Sport For Fun. अहो कसलं Exciting आणि कसलं Fun? नुसत्या कल्पनेनेसुद्धा क्षणभर आपल्या हृदयाचे ठोके थांबतात की काय असं वाटतं.त्याचप्रमाणे SCUBA DIVING हा सुद्धा एक अत्यंत साहसी खेळ आहे:- The Sport of Swimming Under Water-World, With Special Breathing Equipment.-Scuba Gear या उपकरणाच्या मदतीने पाण्याखालच्या जगात स्वैर संचार करणे. हे उपकरण, पाण्याखाली श्वास घेण्यास, पाहण्यास आणि पोहण्यास मदत करते. अमेरिकेत आपल्यामानाने माणसे कमी.. आणि मोकळी जागा मात्र खूप. बरोबर आपल्या उलट. अगदी व्यस्त प्रमाण. पहावं तिथे, मोठमोठी Tennis Court, Badminton Court, Golf Club दिसतात. दर विकएंडला, दिवसभर, मोठमोठ्या मैदानात- लहान मुलं, मोठी माणसं, Soccer, Football, Cricket असे खेळ अगदी उत्साहात खेळतांना दिसतात. त्यामानाने आपल्याकडे खेळापेक्षा शिक्षणाला जास्त प्राधान्य दिलं जातं गमतीचा भाग म्हणजे आपण नेहमी मुलांना सांगतो-आधी अभ्यास पूर्ण कर, मगच खेळायला जा. आहे ना गंमत? पण याचं फार महत्वाचं कारण हे आहे की, आपल्याला शिक्षण घेऊन सेटल् होण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. तिथे आणखी एक प्रकर्षानं जाणवलेली गोष्ट ही की, तिथली माणसं राहण्याची घरंही अगदी सहजपणे सारखी बदलत असतात. जिथलं School District चांगलं, तिथे घरं घेतात. मला अगदी नवलच वाटलं. आपल्याकडे एकदा का घर घेतलं की, शेवटपर्यंत आपण तिथेच राहतो. कारण पै पै जमवून, अत्यंत कष्टाने, काटकसर करून आपण ते बांधलेलं असतं. म्हणून त्यात भावनिक गुंतवणूकही जास्त असते. आत्मीयता असते, त्या घराची ओढ असते-"आपलं घर"-ही. तशीच आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे, आपल्याकडे वाढदिवसाच्या दिवशी म्हणा, कोजागिरी पौर्णिमेला म्हणा, सणावारी- मुलांना, तर भाऊबीजेला भावाला, पाडव्याला पतीराजाना ताम्हणामध्ये निरांजनात दिवे लावून ओवाळण्याची सुंदर पद्धत आहे. तर अमेरिकेत म्हणा किंवा पाश चात्य देशात- वाढदिवसाला पेटविलेल्या मेणबत्या फुंकून टाकण्याची पद्धत आहे. काय हे? नेमकं आपल्या उलट. गंमतच आहे. बदलत्या काळानुरूप आपल्याकडेही वाढदिवसाला केक कापण्याची पद्धत सुरू झाली आहे. हे कांही वाईट नाही. पण पेटविलेले दिवे विझवणं हे कांही आपल्याला बरं वाटत नाही. आपण ते अशुभ मानतो. असो. हा ज्याचा त्याचा प्रश्न.

अमेरिकनांची आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्यांची PETS. त्यांना कुत्री, मांजरी पाळायची भारी हौस. त्यातही कुत्री. ती त्यांना फार आवडतात. म्हणून ती त्यांची PETS. त्यांचे इतके लाड करतात की, कांही विचारूच नका. थंडीत त्यांनासुद्धा जॅकेट्स घातलेली असतात. त्यच्या खाण्यापिण्याचे तर प्रचंड लाड. PETS FOOD नावाची मोठमोठी दुकानंही असतात. १०- १२ वर्षांच्या कांही मुलींच्या हातात तर बाहेर फिरतांनाही, हौस म्हणून अशी खेळण्यातली मोठी मोठी PETS असतात. आपल्याकडे कोणीतरी असं म्हटलेलं, मला आठवतंय की, "गरीबाच्या घरी जन्म घेण्यपेक्ष्शा, श्रीमंताघरचं कुत्रं व्हावं. बिच्चारा. केवढा हा विरोधाभास. पण हेही आहे की, ते लोक त्यांच्या पेट्सची काळजीही खूप घेतात आणि ती घ्यावीही लागते. मरणाच्या थंडीत, भर बर्फातसुद्धा रोज त्यांना एकदा तरी बाहेर न्यावंच लागतं हे कांहीच नाही. ऐकाल तर थक्कच व्हाल. कुत्र्याला बाहेर नेतांना, प्रत्येकाकडे एक प्लॅस्टाकची पिशयी आणि एक छोटीशी सुपली असते. का? तर कुत्र्याने रस्त्या वर घाण केली तर ती गोळा करण्यासाठी. आणि मुख्य म्हणजे लोक ती गोळा करतात हे त्यांचे वैशिष्ट्य. हे असं करणं हा तिथला कायदाच आहे.रीचशी माणसं जुजबी शिक्षण घेतात आणि प्रत्येकजण तो पाळतोच. स्वच्छतेविषयीची त्यांची ही कमालीची जागरूकता, खरंच मानलं पाहिजे त्यांना. अशा या पेट्ससाठी तिथे पाळणाघरंही न्हणजे DayCare-Centre ही असतात २२ वर्षांपूर्वी हे मला माहीत नव्हतं.. लहान बाळांसाठी असतात हे मला ठाऊक होतं. हल्ली आपल्याकडेही कुत्र्यांसाठी अशी डे केयर सेंटर असतात असं मला कळलं. हे तर कांहीच नाही. अहो, तिथं या Pets साठी Pets' Salon ही असतात. या सलूनमधे त्यांची सगळी स्वच्छता केली जाते. आहे ना कमाल. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांचं दफन करण्यासाठी त्यांच्यासाठी स्पेशल दफनभूमीसुद्धा असते. हा अजून एक धक्का. एक मात्र गोष्ट मला तिथे प्रामुख्याने दिसून आली, ती म्हणजे तिथे रस्त्या वर, कुठेही भटकी कुत्री मोकाटपणे फिरतांना दिसली नाहीत, की एकमेकांवर आणि रस्त्यवरून जाणार्या येणार्यांवर भुंकतांना दिसली नाहीत. आपल्याकडे रात्री तर, ती फारच चेकाळतात. अगदी उच्छाद मांडतात. रिक्शा तून जातांनासुद्धा, जीव मुठीत धरून जावं लागतं. त्या कुत्र्यांना चुकवता चुकवता रिक्शवालेही मेटाकुटीला येतात. अमेरिकेत, सिनियर सिटिझन साठीसुद्धा डे केअर सेंटर असतात. तसंच रिटायर्ड लोकांसाठी म्हणून कांही भागात त्यांच्या राहण्यासाठी, सर्व सुखसोयींनी युक्त अशी रिटायरमेंट कम्युनिटी वसाहत विकसित केलेली असते. हल्ली आपल्याकडेसुद्धा, पुण्यात अशाच संकल्पनेवर आधारित, अथश्री नांवाची सुंदर रिटायरमेंट होम्स बनवली आहेत. अमेरिकेतली मला मनाला फार भावलेली आणकी एक गोष्ट म्हणजे, अशी मुलं ज्यांना जन्मतःच कांही प्रॉब्लेम

असतात-शारीरिक म्हणा, मानसिक म्हणा-अशांना SPECIAL CHILD म्हणतात. त्यांची खास काळजी घेतली जाते. त्यांच्यासाठी Speech Therapy, Physio Therapy इत्यादी सुविधा शाळेतच मोफत उपलब्ध केलेल्या असतात. त्यासाठी पालकांना दुसरीकडे जावं लागत नाही. किती छान. पालकांच्या दृष्टीनं किती सोयीच आहे हे. आणि महत्वाचंसुद्धा. आपल्याकडे अशी मतिमंद, गतीमंद, किंवा आणखी कांही वेगळ्या समस्या असणारी मुलं असतील तर पालक या गोष्टी लपविण्याचा प्रयत्न करतात. त्यात कमीपणा मानतात. त्याचं, हेही एक कारण आहे की, आपल्याकडे लोक त्यांना नावं ठेवतात, हिडिस फिडीस करतात. हे पाहून खूप वाईट वाटतं. पण अमेरिकेत मात्र असं होत नाही. उलट योग्य वेळी त्यांची काळजी घेतली जाते आणि ट्रीटमेंट सुरू होते.

अमेरिकेतलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक घराबाहेर मग तो स्वतंत्र बंगला असो किंवा Apartment Complex - - त्याच्या बाहेर लॉन (हिरवळ) मेंटेन केलंच पाहिजे असा नियमच आहे. रस्त्यावर पार्किंग, ठराविक जागीच असा कडक कायदा. नाही केलं तर गाड्या उचलून नेतातच. लायसन्सही जप्तच. रस्त्या वरून सारख्या पोलीसांच्या गाड्या फिरत असतात. सिग्नल तोडला, ठराविक मर्यादेपेक्ष्शा जास्त स्पीड ठेवला तर लगेच पोलीस पकडतात. तिकडे लोक पोलीसांन प्रचंड घाबरतात.. मात्र आपल्याकडची बरीचशी तरूण मुलं, बेदरकारपणानं, हायवेवर तर अगदी बेफामपणे गाड्या हाणतात. हो, हाणतातच. कोणालाही घाबरत नाहीत. कायद्याला जुमानत नाहीत. अमेरिकेतले कायदे, नियम एकदम कडक. न पाळणार्यांना जबर शिक्षा. तिही वेगवेगळ्या प्रकारची. म्हणून तिथे शिस्त जास्त. हे मुद्दाम नमूद करण्याजोगं रस्त्या वरून लहान मुलं, बुद्ध व्यक्ति, अपंग असे कोणी जात असतील तर त्यांना आधी जाऊ देतात. त्यांच्या बाबतीत प्रचंड जागरूकता, सावधानता आणि काळजी घेतली जाते. अपंगांसाठी, पार्किंगची वेगळी जागा राखीव ठेवलेली असते. तिथे दुसरं कोणीही गाडी पार्क करत नाही. नियम म्हणजे नियम. दुसरी एक अगदी कौतुक करण्याजोगी गोष्ट पाहिली ती अशी की, शाळा सुटल्यावर लहान मुलं बाहेर पडली की, त्यांना रस्ता क्रॉस करून देण्यासाठी, क्रॉसिंगवर पोलीस उभे असतात, कांही स्वयंसेवकही विशिष्ट रंगाची जॅकेट्स घालून मदतीसाठी उभे असतात. याचा मात्र आवर्जून उल्लेख करायलाच हवा.

एरव्ही फॅमिली डॉक्टर ही संकल्पना जरी तिथे अस्तित्वात नसली तरी, घरी केणी आजारी असेल, सिरियस असेल तर- ९११ - या नंबरवर कॉल केला की, ताबडतोब डॉक्टर, स्ट्रेचर, कर्मचारी, पोलीस यांच्यासह सुसज्ज गाडी घरासमोर हजर लगेच ट्रिटमेंटची तयारी. थोडीही दिरंगाई नाही. कुठे अॅक्सिडेंट झाला किंवा अगदी दूरवर-निर्जन ठिकाणी, कुणाची गाडी बंद पडली तर, ट्रिपल् ए -- (AAA), या विशिष्ट नंबरवर फोन केल्यावर, तातडीनं त्या ठिकाणी मदतीसाठी RESCUE SCOD हजर. लोकांची सुरक्षा -या गोष्टीला अमेरिकेत प्रथम प्राधान्य दिलं जातं. हे अत्यंत महत्वाचं. वेळ पाळण्याच्या बाबततीतही ते अत्यंत काटेकोर, दक्ष असतात. अमेरिका हे विकसित राष्ट्र असल्याने, तिथे जे अमेरिकन सिटिझन असतात, अशा ६५ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी, सर्व प्रकारची वैद्यकीय सेवा, उत्तम सोयीं- सुविधांसहित मोफत उपलब्ध असते- संपूर्ण अमेरिकेत कोठेही गेलात तरी. आणि त्यांना ठराविक पेन्शनही मिळतं.

अमेरिकनांची एक खास नजरेत भरण्याजोगी गोष्ट म्हणजे घरांची मनमोहक रचना, अंतर्गत सजावट, उत्तम Decoration. अगदी बाथरूममध्येसुद्धा सुंदर आकाराचे नक्शीदार आरसे, झगमगीत दिवे, सुबकसे फ्लॉवरपॉट. त्यात फुले. सुगंधी Air-Freshner, सुवासिक कोल्ड क्रीम, छोट्या मुलांचे ब्रश, टूथपेस्ट इ. ठेवण्यासठी-मनीमाऊ-भूभूच्या आकाराचे छोटे-छोटे सुंदर पॉट ठेवलेले असतात. हे सारं. पाहून खूप गंमत वाटली. कांही घरांना काचेचे कलात्मक प्रवेशद्वार असते. प्रत्येक घराबाहेर सुंदर बाग फुलवलेली असते. तिथल्या हवामानामुळेही असेल-फुलं अशी कांही फुलतात की कांही विचारूच नका. फुलांचे मोठमोठे गुच्छच्या गुच्छ. त्यांचे डेरेदार गेंद फुललेले. अगदी भरघोस डोळ्यात मावणार नाहीत असे. फारच सुंदर. बघतच राहावेत. तसेच कॉम्प्लेक्सच्या दुतर्फा रंगीबेरंगी फुले लावलेली असतात. घरामागे विविध प्रकारच्या भाज्याही लावलेल्या असतात. भाज्यांचं पीकही भरपूर येतं. ज्यांना बागेची हौस असते, पण जागा नसते, अशांसाठी तिथली म्युनिसिपालिटी कांही ठराविक क्षेत्राची जागा त्यांना देते. असे अनेक वाफे जागा, आखून- राखीव ठेवलेल्या असतात. द्रुक्ष लागवडीला प्रोत्साहन म्हणून. खरंच हेसुद्धा कौतुकास्पद आहे. तिथल्या लोकांना गार्डनिंगची खूप आवड असते. मात्र ही बाग, हे सौंदर्य हे सगळं अगदी फक्त त्या सीझनपुरतंच असतं अगदी २-३ महिन्यांपुरतं. एकदा का थंडी पडायला लागली की, सगळं सगळं नाहीसं होतं. त्याचं नामोनिशाणही मागे राहत नाही. थंडीची चाहूल लागली की, सुरुवातीला हळूहळू पानं गळायला लागतात. याला तिथे फॉल सीझन म्हणतात. त्याचंही त्यांना फार अप्रूप असतं. कारण यावेळी हळूहळू पानांचे रंग बदलायला लागलेले असतात. पिवळे, लाल, केशरी असे. आणि ते द्रुष्य, अगदी पाहण्याजोगं असतं अप्रतिम असं. ते पाहण्यासाठी सगळे गाड्या काढून दूरदूर जात असतात. ते लोक असे प्रत्येक सीझन मस्त एंजॉय करत असतात.

नंतर मात्र बर्फ पडायला सुरुवात होते. एवढी कडाक्याची थंडी की, शिकागोसारख्या कांही भागात तर ३३F (फॅरनहाईट) एवढं तापमान असतं. अति थंडीमुळे घरं कडेकोट बंद. त्यामुळे घरात डास, कोळी असे कीटकही सहसा नाहीतच. समजा चुकून एखादी माशी आलीच तर तिला घराबाहेर घालवण्यासाठी नुसती धावपळ. गंमतच वाटली मला. आपल्याकडे डास काय आणि माशी काय? आवो जावो घर तुम्हारा घरं उघडीच ना? त्यामुळे आपल्याला सगळ्यांची सवय असते. तिथे अति स्वच्छता. पाणी मुबलक. तरी त्याचा वापर कमी. बहुतेक थंड हवामानामुळेही असेल. पाण्याऐवजी किचनमध्ये, बाथरूममध्ये टिश्श्यू पेपरचाच वापर जास्त. ते टराटर फाडायचे, हात पुसायचे की द्या फेकून. बघून मला नवलच वाटलं. Use and Throw - हीच त्यांची संस्कृती. घड्याळं, मिक्सर अशा गोष्टी बिघडल्या, बंद पडल्या तर फेकूनच द्यायच्या. का? तर म्हणे तिथे दुरुस्तीचाच खर्च जास्त. त्यापेक्ष्क्षा नवीन घेणं परवडतं. काय हे? ऐकून आपला जीव मात्र खालीवर. कारण आपल्याला सगळ्या गोष्टी अगदी पुरवून पुरवून वापरायची सवय. काटकसरीनं राहणं हे संस्कार. अर्थातच चांगले. आजोबांचं घड्याळ आपण अजूनही कसं जपून ठेवलंय, हे अगदी कौतुकानं सांगतो आणि त्याचा आपल्याला अभिमानही वाटतो. कमीपणा तर मुळीच वाटत नाही. हा त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीतला ठळक फरक. आता काळ बराच पुढे गेला आहे. लोकांच्या हातात बराच पैसाही खुळखुळतो आहे. त्यामुळे साहजिकच आपल्याकडेही विचार करण्याची पद्धत बदलत चाललेली आहे.

अमेरिकनांचं अजून अक वेगळं वैशिष्ट्य असं की, आठवडाभर भरपूर काम करायचं आणि वीकएंड मात्र ओकदम मस्त एंजॉय करायचा. वीकएंडला, घरात बहुतेक कोणी थांबतच नाहीत. आपापल्या गाड्या बाहेर काढतात की, चालले दूरदूर. Outing साठी - Sight-seeing, Rock climbing, तसेच Beachesवर, निरनिराळे साहसी खेळ खेळायला, Adventures करायला. खाणंपिणं सगळं बाहेरच. Full to धमाल. आपल्या मुलांचे आई-बाबा म्हणून आपण जेव्हां अमेरिकेत पहिल्यांदा जातो, तेव्हां एकंदरीतच, अमेरिकनांची लाईफ स्टाईल पाहून आपण एकदम थक्क होऊन जातो. सगळंच कल्पने पलिकडचं त्यातून तिथले हवामान-थंडी-सहन करण्या पलिकडची सुरुवातीला हे सगळंच नवीन नवीन असल्यानं, प्रत्येक गोष्टीत, सारखी आपली आणि त्यांची तुलना करणं सुरू होतं. त्यांना नांवं ठेवली जातात. आणि हे सारं स्वाभाविकही आहे. तिथे गेलेल्या प्रत्येक भारतीयांच्या बाबतीत हे असंच होतं. पण आपण हेही मान्य करायला हवं की, आपल्या मुलांच्यामुळेच, आपल्याला संपूर्ण जगातील महासत्ता असलेली जादूभरी, मोहमयी अमेरिका पाहायला मिळाली. कधी काळी हा विचारही डोक्यात नव्हता आला की, आपण अमेरिका पाहू, एका झगमगत्या दुनियेत जाऊ.

याचा अर्थ असा नाही की, U.S. म्हणजेच सगळं कांही. त्यांचं ते सगळंच चांगलं आणि आपलं ते सगळंच वाईट. असं नक्कीच नाही. आपल्याकडेही खूप चांगल्या गोष्टी आहेत. त्या आपण धरून ठेवल्याच पाहिजेत. उदा.- वडीलधार्यांचा आदर राखणं, त्यांना मान देणं, त्यांच्याशी नम्रतेनं बोलणं, आदबीनं वागणं, परमेश्वराप्रती श्रद्धा ठेवणे (म्हणजे भोंदू बाबाच्या नादी लागणे नव्हे), सर्वांशी मिळूनमिसळून, एकजुटीनं राहणे, नाती जपणे इत्यादी. याशिवाय आणखी महत्वाचं म्हणजे - आपल्या भारतीय संस्कृतीची जी दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत ती एक म्हणजे हजारों वर्षांची परंपरा असणारी प्राचीन योगविद्या आणि दुसरे म्हणजे आपले अभिजात शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य, शिल्पकला इ. या सर्वांची जपणूक केलीच पाहिजे. नको त्या बाबतीत अमेरिकनांचे अंधानुकरण नको. तर त्यांची शिस्त, स्वच्छता, नियमितपणा, वक्तशीरपणा, वेळेचं महत्व, श्रमप्रतिष्ठा-कोणतेही काम करण्यात कमीपणा न मानणे, स्वावलंबन, त्यांची सौंदर्यदृष्टी, कलात्मकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पोलीसांची भिती. कायद्याची कडक अंमलबजावणी, काटेकोर कायदेपालन अशा ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या नक्कीच अनुकरणीय आहेत. त्या आत्मसात करायलाच हव्यात. याबाबत कोणाचंच दुमत नसावं. पण त्यांचे कपडे, खटकणार्या फॅशन, स्वैर वागणं, टोकाचं व्यक्तीस्वातंत्र्य अशा गोष्टीं अनुसरून, आम्ही किती फॉरवर्ड आहोत, मॉडर्न आहोत हे दाखविण्याची अजिबातच गरज नाही. त्यांचं काय घ्यावं, काय न घ्यावं याचा योग्य तो सारासार विचार हवा. सद्सद्विवेक हवा. एकानं केलं म्हणून दुसर्यानं केलं असं नको. त्यांच्या खूपशा गोष्टी आपल्याला न पटणार्या, न आवडणार्या, अतिशय खटकणार्याही आहेत. पण, तरीही त्यांच्याकडून घेण्यासारखंही बरंच कांही आहे. म्हणून आपल्यातल्या आणि त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टींची योग्य ती सांगड घालून, त्याचा सुवर्णमध्य साधला पाहिजे शेवटी मनापासून एवढंच म्हणावंसं वाटतं की- "आहे मनोहर तरी"

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes