लाडक्या बहिणी योजनेतून सुरू केला व्यवसाय, असा कमावला नफा
schedule23 Sep 24 person by visibility 61 categoryनोकरी
लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. मध्यप्रदेश सरकारच्या धरतीवर ही योजना राज्यात सुरू करण्यात आली. या योजनेत दरमहा 1500 रुपये देण्याचे आश्वासन सरकारने दिले. या योजनेचे दोन हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात 15 ऑगस्टनंतर जमा झाले. आता तिसरा हप्ता या महिना अखेर देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने ही योजना सुरू केल्याचा आरोप करण्यात आला. जनआधार गमावल्यानेच अशा योजना आणण्यात येत असल्याची टीका महाविकास आघाडीकडून करण्यात आली. मात्र तळागाळातील महिलांना योजनेचा मोठा फायदा झाला. यातून काही सकारात्मक घडामोडीही समोर येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. परळीतील एका महिलेने याच तीन हजार रुपयांमध्ये घरगुती लघुउद्योग सुरू केला आहे.
परळी शहरातील नेहरू चौक तळ विभागात राहणाऱ्या अक्षरा शिंदे यांनी ही यशोगाथा लिहिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर त्यांना या योजनेत 3000 रुपये प्राप्त झाले. हे पैसे इतरत्र ठिकाणी कुठेही खर्च न करता त्यांनी एक लघुउद्योग सुरू केला. आर्टिफिशल वटवृक्ष झाडे तयार केले.अक्षरा यांच्या सासू देखील या व्यवसायात त्यांना मदत करत आहेत. दीडशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत या झाडाची विक्री केली जाते आहे.