उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी?
schedule23 Nov 24 person by visibility 113 categoryराजकीय
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला (भाजप) मोठे यश मिळाले असून, महायुतीने 288 पैकी 216 जागांवर आघाडी मिळवली आहे. भाजप या युतीतील सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्याने स्वबळावर 145 हून अधिक जागा जिंकल्या असल्याची माहिती मिळत आहे.
महायुतीच्या प्रचंड यशामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारची स्थापना निश्चित झाली आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याने त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपला मिळालेल्या यशामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यातील ग्रामीण भागांपासून शहरी भागांपर्यंत प्रभाव टाकला असून, मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे.भाजप आणि महायुतीच्या विजयामुळे राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. लवकरच पक्षाकडून आमदारांच्या बैठका घेतल्या जातील आणि मुख्यमंत्रीपदासाठी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
महायुतीचे नेतृत्व सध्या सत्ता स्थापनेसाठी रणनीती ठरवत असून, लवकरच राज्यपालांकडे दावा करण्यात येईल. राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्याचे महायुतीचे उद्दिष्ट असल्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटले आहे.राज्याच्या राजकारणात या निकालामुळे मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या यशामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग अधिक गतीमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.