कागल तालुक्यात १५०० कोटींचा निधी भ्रष्टाचाराच्या कचाट्यात?
schedule24 Oct 24 person by visibility 88 categoryगुन्हे
कोल्हापूर: राज्यातील ग्रामविकासासाठी शासनाकडून उपलब्ध असलेल्या ६ हजार कोटींच्या निधीपैकी कागल तालुक्यासाठी तब्बल १५०० कोटींचा निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वितरित करण्यात आला. मात्र, या निधीच्या वापरात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंता दीपक कुराडे यांनी केला आहे.
कुराडे यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवण्यासाठी ६ लाख रुपये भरले, परंतु त्यांना संपूर्ण माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. कुराडे यांच्या मते, उपलब्ध असलेल्या २ लाख ६३ हजारांपैकी फक्त १ लाख पानांची माहिती मिळाली आहे, ती देखील फारशी उपयुक्त नसल्याचं त्यांनी नमूद केलं.
कुराडे यांच्या म्हणण्यानुसार, तालुक्यातील विविध विकास कामांमध्ये मर्जीतील ठेकेदारांना ठेके दिले गेले आहेत, ज्यामुळे ठेकेदारांनी या निधीतून ७०० कोटी रुपये लाटले आहेत. हा सर्व घोटाळा लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या मिलीभगतीतून झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर प्रकाश टाकण्यासाठी कुराडे यांनी घेतलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना अपील अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. कुराडे यांनी असा दावा केला आहे की, या प्रकारात अधिकाऱ्यांची देखील हात आहे आणि त्यांनीच माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे, कारण यातून तालुक्यातील विविध योजनांमधील भ्रष्टाचार उघड होईल.