विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; आधार योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ
schedule26 Aug 24 person by visibility 92 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शासनाने सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत अर्ज स्विकृतीस दि.31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि अद्यापी काही अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रीया सुरु असल्याने विद्यार्थ्यांना विहीत वेळेत अर्ज करण्यास शक्य नसल्याने मुदतवाढ देण्यात आली असून जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे.
उच्च शिक्षणाचे द्वितीय, तृतीय, चतुर्थ वर्षासाठी अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 असून निवड यादी जाहीर करण्याचा तारीख 15 ऑक्टोबर 2024 अशी आहे. तर उच्च शिक्षणाच्या प्रथम वर्षासाठी अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 असून निवड यादी जाहीर करण्याची तारीख 30 ऑक्टोबर 2024 अशी आहे.
राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानीत आणि कायम विना अनुदानीत महाविदयालय, तंत्रनिकेतनांमध्ये शासनाने निर्धारीत केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता वसतिगृह योजनेपासून वंचीत असलेल्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचीत राहू नये यासाठी शासन निर्णयान्वये आदीवासी विकास विभागाच्या स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र वसतिगृह निर्वाह भत्ता योजना लागू करण्यास मान्यता दिली आहे, यानुसार अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर या ठिकाणी संपर्क साधावा, असेही श्रीमती नेर्लीकर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.