कोल्हापुरी चप्पल अस्सल की बनावट; ओळखण्यासाठी क्यूआर कोड करणार मदत
schedule28 Feb 24 person by visibility 100 categoryउद्योग
कोल्हापूर ; कोल्हापुरी चप्पलची ख्याती आता जगभरात गाजत आहे. देश विदेशातून आलेल्या पर्यटकांना नेहमीच चप्पलेची भुरळ पडते. पण हीच कोल्हापुरी चप्पल आता बनावट कोल्हापुरी चप्पलच्या विळख्यात अडकली आहे. तिला यातून बाहेर काढण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी झाला असून, कोल्हापुरी चप्पलेस 'क्यूआर कोड' मिळाला आहे.
चपलेच्या आत ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित एक छोटी चीप बसविण्यात आली असून ही चप्पल मोबाईलने स्कॅन करताच ही कुठे बनवली, कोणत्या कारागिराने बनवली, याची माहिती उपलब्ध होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आता बनावट कोल्हापुरी चप्पल बनविणाऱ्यांवर आणि या बनावट चपलांच्या विक्रीवरही चाप बसणार आहे. बाजारात बनावट कोल्हापुरी चपलांचा - सुळसुळाट वाढल्याने त्याला आळा घालण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने (लिडकॉम) नवा प्रयोग राबवत कोल्हापुरी चपलांना 'क्यू आर कोड दिला आहे.
ग्राहकांना अस्सल आणि चांगली कोल्हापुरी चप्पल मिळावी यासाठी 'लिडकॉम'ने ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित नवीन चपला विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत, हे तंत्रज्ञान इमरटेक इनोव्हेशन प्रा. लि. या कंपनीने बनविले आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे आता ग्राहकांना आता मोबाईलच्या एका क्लिकवर कोल्हापुरी चप्पल ही अस्सल आहे की बनावट आहे हे सहज ओळखता येणार आहे.