मोदींच्या शपथ विधी समारंभासाठी या देशांचे नेते होणार सहभागी
schedule08 Jun 24 person by visibility 137 categoryलोकसभा निवडणुक
दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ च्या विजयानंतर, NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी रविवार सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे.
या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ने 293 जागा जिंकल्या आहेत. यात एकट्या भाजपच्या 240 जागा आहेत. या शपथ विधी समारंभासाठी बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरीशस आणि सेशेल्सचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या पाच कंपन्या, नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) कमांडो, ड्रोन आणि 'स्नायपर्स' तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, परदेशी पाहुणे राजधानीतील लीला, आयटीसी मौर्य, ताज, ओबेरॉय आणि क्लेरिजेस हॉटेल्समध्ये थांबणार आहेत. यामुळे हे हॉटेल्स देखील सुरक्षेच्या कक्षेत घेण्यात आले आहेत.