नवरा माझा नवसाचा 2’ची ट्रेन सुसाट
schedule23 Sep 24 person by visibility 67 categoryमनोरंजन
‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंगपैकी एक आहे. एक हजारपेक्षा अधिक शोजने सुरुवात केलेल्या या चित्रपटाचे 600 पेक्षाही अधिक शोज हाऊसफुल्ल होते. पहिल्या वीकेंडला या सीक्वेलने दमदार कमाई केली.
एप्रिल 2005 मध्ये ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि बघता बघता या चित्रपटाने प्रेक्षकांवर जादूच केली. इतक्या वर्षांनंतरही या चित्रपटाची जादू कायम असून नुकताच त्याचा सीक्वेल थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. दमदार स्टारकास्ट, पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे.
20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाला गणपती बाप्पाच पावला असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या वीकेंडला या चित्रपटाने 7.84 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलंय. यात अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे यांच्यासह मोठी स्टारकास्ट आहे.