कोल्हापूर जिल्ह्यात रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा
schedule24 Jul 24 person by visibility 89 categoryउद्योग
कोल्हापूर : राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांना अधिक स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, तसेच महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करण्यासाठी संपूर्ण राज्यातील एकूण १७ जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी इच्छुक गरजू महिलांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, २ रा मजला, एस. पी. ऑफीसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर (दुरध्वनी क्र. ०२३१-२६६१७८८) वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. एस. वाईंगडे यांनी केले आहे.
इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व रिक्षा चालविण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई-रिक्षा उपलब्ध करुन देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
या योजनेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे-
लाभार्थी कुटूंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे. लाभार्थी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 3 लाखापेक्षा जास्त नसावे. लाभार्थ्यांकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे. विधवा, कायद्याने घटस्फोटीत, राज्यातील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षणगृह बालगृहातील आजी, माजी प्रवेशिता यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच दारिद्रयरेषेखालील महिलांना सुध्दा प्राधान्य देण्यात येईल. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. लाभार्थ्यांची निवड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत असलेल्या समितीकडून करण्यात येईल. पात्र लाभार्थी ई-रिक्षा किंमतीच्या १० टक्के, राज्य शासन २० टक्के आणि बँक ७० टक्के कर्ज उपलब्ध करुन देईल. कर्जाची परतफेड ५ वर्ष (६० महिने) आहे. योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येईल.