Maha Hit 24
Register

जाहिरात

 

गरोदर मातांची एचआयव्ही व गुप्तरोग तपासणी प्राधान्याने करुन घ्या; जिल्हाधिकारी अमोल येडगे

schedule13 Aug 24 person by visibility 88 categoryआरोग्य


कोल्हापूर : प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जिल्ह्यातील सर्व गरोदर मातांची एचआयव्ही व गुप्तरोग तपासणी प्राधान्याने करुन घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या. 

    
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर, जिल्हा साथ रोग वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत रेवडेकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.परवेज पटेल, शहर क्षयरोग अधिकारी डॉ.अमर पोवार, एआरटी सेंटरचे वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच इतर समिती सदस्य उपस्थित होते. अतिजोखमीच्या गटाच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हास्तरीय समुदाय संसाधन समूह समितीची स्थापना या बैठकीत करण्यात आली. यावेळी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत एचआयव्ही संसर्गित प्रलंबित प्रकरणे जिल्हाधिकारी यांच्या सूचनेमुळे मार्गी लागल्याबद्दल विहान प्रकल्प तसेच सर्व स्वयंसेवी संस्थांमार्फत जिल्हाधिकारी येडगे यांचे आभार मानण्यात आले.

शिरोली, कागल, गोकुळ शिरगाव या तिन्ही एमआयडीसी क्षेत्रातील स्थलांतरित कामगारांसाठी एचआयव्ही तपासणी कार्यक्रम प्रभावीपणे राबवा. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये एच आय व्ही कीट साठवणुकीसाठी रेफ्रिजरेटरची खरेदी करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करा, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी केल्या.

 वेश्या व्यवसाय करणाऱ्या तृतीयपंथीयांसाठी प्रमाणित कार्यप्रणाली तयार करण्याच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या एच आय व्ही एड्स राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत कोल्हापूर मधील जान्हवी कुलकर्णी हिने तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी कौतुक केले. 
जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes