Maha Hit 24
Register

जाहिरात

 

पावसाळी भाजी ... अळू

schedule05 Aug 24 person by visibility 85 categoryखवय्येगिरी


कोकणात प्रत्येकाच्या आगरात अळू , केळी आणि कर्दळी असतातच. उन्हाळयात पाण्याच्या कमतरतेमुळे जरा कोमेजल्या तरी तग धरून असतात. पावसाला सुरुवात झाली की मात्र भरपूर पाण्यामुळे अगदी तरारून येतात. केळी साठी नाही पण अळू आणि कर्दळी साठी “ माजणे “ हा खास शब्दप्रयोग ही वापरात आहे.


पावसाळ्यात अळू अक्षरशः फोफावत, त्याची पान ही अगदी हत्तीच्या कानाइव्हढी मोठी होतात , देठी चांगली जाडजूड होते . आळवाचा दळा इतका भरगच्च होतो की भाजीसाठी अळू कापायला जाताना ही किरडू मारडू निघेल की काय अशी भीती वाटते. शहरात मिळत तस तळहाता एवढ्या पानांचं आणि सुतळी सारख्या देठांचं अळू खर तर घेववत ही नाही हातात पण नाईलाज असतो. इकडे शहरात मिळतं तस वडीचं किंवा भाजीचं असं सेपरेट अळू नसतं कोकणात . पांढऱ्या देठाचं आणि कमी डार्क पानांचंच अळू असत आमचं आणि आम्ही त्याच्याच वड्या आणि पात्तळ भाजी असं दोन्ही करतो.

पूर्वी कोकणात मार्केट हा प्रकारचं नव्हता , घरात जे पिकेल तेच आणि फक्त तेच खावं लागे. त्यामुळे पावसाळ्यात आठवड्यातून तीन वेळा तरी अळूची पात्तळ भाजी होत असे. तिला “फ़दफद” हा खास शब्द ही आहे पण का कोण जाणे इतक्या चवदार भाजीला मला तो शब्द वापरणे आवडत नाही. तसं ही कोकणात आमच्याकडे फ़दफद किंवा पात्तळ भाजी यापैकी काही ही न म्हणता नुसतं “ अळू “ च म्हटलं जातं अळूच्या पात्तळ भाजीला.

भरपूर पाण्यामुळे कोकणातल्या आळवाची पान जरी मोठी असली तरी ते खूपच कोवळं आणि मऊ असतं त्यामुळे त्याची भाजी छान मिळून येते आणि चवीला ही सुंदर लागते. चिंच, ( आळवाच्या कोणत्याही पदार्थात काही तरी आंबट घालावं लागतंच नाहीतर घशाला खवखवत ) गूळ, दाणे, आठळ्या, खोबऱ्याच्या कातळ्या आणि काजूगर घातलेली ती भाजी घरात सगळ्यांनाच प्रिय. वरण भात आणि अळूची भाजी हा फेवरेट मेन्यू. त्याचा दुसरा फायदा म्हणजे त्या दिवशी वेगळी भाजी नाह केली तरी चालत असे.  

कधी तरी क्वचित सणावाराला अळू वड्या ही होतात. पण श्रावण महिन्यात येणाऱ्या मात्र अळू वडीला खास महत्त्व आहे. ह्याच आळवाच्या. अश्या कुरकुरीत खमंग अळूवड्या मी इतर कुठे ही खाल्ल्या नाहीयेत. परंतु कोकणातल्या माणसांना तळलेल्या गोष्टींपेक्षा उकडलेले पदार्थ जास्त आवडतात त्यामुळे अळूवड्यांची भाजीच बरेच वेळा केली जाते. म्हणजे वड्यांसारखे उंडे करून ते उकडून गार झाले की त्याच्या चौकोनी फोडी करायच्या छोट्या छोट्या आणि त्या तीळ आणि थोडं जास्त तेल घातलेल्या फोडणीत हलक्या हाताने परतायच्या. वरून भरपूर ओल खोबरं घातलं की भाजी तयार. ही भाजी चवीला खूप छान लागते आणि भाजी सारखी पोळीला लावून खाता येते आणि पुन्हा कमी तेलकट. अर्थात उंडे करण्याचा व्याप मात्र आहे. कधी कधी अळूवड्या न तळता नारळाच्या रसातल्या अळूवड्या ही करतो. मीठ, तिखट वैगेरे घातलेल्या नारळाच्या रसात अळूवड्या थोड्या शिजवल्या की ही सात्विक चवदार भाजी तयार होते.

अळूवड्या

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes