Maha Hit 24
Register

जाहिरात

 

अशी झाली फादर्स डे ची सुरुवात ; सौ. शैलजा धामणकर-निंबाळकर

schedule21 Jun 24 person by visibility 174 categoryआंतरराष्ट्रीय

कोल्हापूर; फादर्स डे या वर्षी, रविवार दि.१६ जून २०२४ रोजी संपन्न झाला. हा दिवस साजरा करण्याची प्रथा अमेरिकेत सुरू झाली. युरोप आणि इतर कांही देशात, तो साजरा करण्याच्या पद्धती, प्रत्येक धर्मीयांच्या वेगळ्या आहेत आणि तारखाही वेगळ्या आहेत. पण संपूर्ण जगावर अमेरिकेचे आधिपत्य असल्याने, त्यांच्या प्रथेनुसारच साधारणपणें जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. 

अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या SONORA SMART DODD नावाच्या मुलीला, तिच्या पित्याच्या स्मरणार्थ 'फादर्स डे' साजरा करण्याची कल्पना सुचली. तिचे वडील युद्धात लढलेले सैनिक होते. पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी SONORA व तिच्या पाच भावंडांचा सिंगल पेरेंट म्हणून एकट्याने सांभाळ केला. संगोपन केलं. त्यांना शिक्ष्क्षण दिलं. सोनोराने तिचं शिक्षण पूर्ण केल्यावर Father's Day - International डे म्हणून राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यास सरकारला उद्युक्त केलं अशी ही कथा आहे. अमेरिकेची संस्कृती आणि आपली भारतीय संस्कृती यात जमीन आसमानाचा फरक आहे. अमेरिकेत टोकाचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. तिथे वयाच्या अठराव्या वर्षीच मुले घराबाहेर पडतात. नंतर फक्त ती आणि त्यांचे भवितव्य. यानंतर आई बाबा, भावंडं एकत्र राहण्याची पद्धतीच नाही. म्हणून मदर्स डे, फादर्स डे, ग्रँड पेरेंट्सडे साजरे करण्याची तिथे प्रथा आहे. एवढंच नाही तर, फादर्स डे या संकल्पनेतून पुढे Father in law day, Grandfather in law day, Grand grand Father day म्हणजेच सासरे, आजेसासरे, पणजोबा या सार्याचेही डे साजरे करण्याची आधुनिक प्रथाही रूढ होत आहे. गंमत आहे ना.. या दिवशी आई म्हणा, वडील म्हणा-त्यांना घेऊन मुलं हॉटेलात किंवा इतरत्र जातात, पार्टी करतात. फादर्स डेला, बाबांना पुष्पगुच्छ, गिफ्ट कार्ड, केक वगैरे देऊन त्यांचा सन्मान करतात. त्यांच्या चेहरयावर हास्य फुलवितात. एकत्रितपणें हा दिवस साजरा करतात. यादिवशी अमेरिकेत सर्वत्र हीच लगबग दिसून येते. कुटुंबात, समाजात असणारे पित्याचे स्थान, त्याची भूमिका यांचा सन्मान करण्यासाठी, पित्याच्याप्रती कृत‌द्व्यता व्यक्त करण्यासाठी, शुभ कामना देण्यासाठी हा दिवस संपन्न केला जातो. तसेच पिता-पुत्र पुत्री यांच्या नात्यात असणार्या नाजूक रेशीमबंधाचा-पित्रुबंधाचा गौरव केला जातो. आपल्या भारतीय कुटुंब व्यव स्थेत, खासकरून एकत्र कुटुंब व्यवस्थेला विशेष स्थान आहे. ज्यात आईवडील, आजीआजोबा, भावंडं एकत्र नांदत असतात. वडीलधार्यांना मान देणे, त्यांचा आदर करणे, त्यांच्याशी आपुलकीने, प्रेमानें वागणे असे संस्कार जोपासले जातात. त्यामुळे वेगळे असे फादर्स डे, मदर्स डे साजरे करणे ही संकल्पनाच नाही. पण आता काळ खूपच पुढे गेलाय. खूप बदललाय. आधुनिक लाईफस्टाईल नुसार कुटुंबं विभक्त होऊ लागली. ते कांही असो. पण फादर्स डे वगैरे साजरे करण्यामागचा हेतू चांगला आहे. उदात्त आहे. जरी ही पाश्चिमात्य संस्कृती असली तरीही, जे चांगलं आहे- जरी ते दुसर्याचं असलं तरीही, ते घ्यायला काय हरकत आहे? या फादर्स डेला आपण पित्रुदिन म्हणू हवं तर. नाही तरी आपली संस्कृती आहेच ना-"आधी मात्रुदेवो भव, नंतर पित्रुदेवोभव-आचार्यदेवो भव- अशी. आपल्याकडे आईला तर गृहलक्षमीच्या रूपात पाहिलं जातं. तिचं वागणं, बोलणं, तिचा वावर. या सर्वांचा मुलांच्या मनावर फार मोठा परिणाम होत असतो. मुलांच्या मेंदूचा विकास होण्याच्या काळात, नकळत ती आईचं अनुकरण करत असतात. संस्कारित होत असतात. म्हणून तिचं वर्तन आणि घरातला वावर ही तिची फार मोठी जबाबदारी आहे. गीतेतील -" कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" या श्रलोकानुसार ती निरपेक्ष वुत्तीने, कोणत्याही फळाची अपेक्ष न ठेवता, ती घर चालवत असते. सगळ्यांचं हवं नको ते पाहते. दुखलं खुपलं सांभाळते. म्हणून ती खरी कर्मयोगिनी आहे. ती अशी कोणीतरी असते की, जिच्या पुण्याईनें, कृपेने घर आनंदात नांदत असते. परंतु जशी आईची जबाबदारी, तेवढीच पित्याचीही जबाबदारी महत्वपूर्ण ठरतें संसारात माता-पिता ही दोन्ही एकाच रथाची दोन चाकं आहेत. पिता हा मुलांना आधार देतो, साहस देतो, व्यवहार शिकवितो. लढण्याचं बळ देतो. घराला संरक्षण देतो. हे तर खरंच. म्हणून त्याचंही वर्तन, वागणं, बोलणं योग्यच हवं. नेकीचं, प्रामाणिक हवं. घरांत आणि बाहेरही. पिता दिसतो कठोर, वागतो कठोर. पण त्यामागचं प्रेम हे न दिसणारं असतं- भगवंतासारखं घरासाठी, मुलाबाळांसाठी त्याला किती जणांसमोर खाली झुकावं लागतं. जे आपल्याला मिळा लं नाही, ते आपल्या मुलाबाळांना मिळावं यासाठी तो धडपडत असतो. मुलं यशस्वी झाली की, तो खूष होतो. जरी तो स्वतः मागे राहिला तरीही. म्हणून पिता हासुद्धा खरा कर्मयोगीच आहे. तो Friend- Philosopher आणि Guide आहे. कोणीतरी म्हटलंय की, पिता का प्यार रक्षक बनकर रहता है, पूरे घर को कंधे पर बिठाता है, दुनिया दिखाता है." तर सांगायचा मुद्दा हाच की, "Father's Day "हा वडिलांचा गौरव करण्याचा, त्यांना सन्मानित करण्याचा दिवस आहे. आई ही तर आपली जन्मदात्री आहेच, जगन्माता आहे. परमपूजनीय, वंदनीय आहेच. तद्वतच बाबा हे, मुलांच्या मनाला, विचारांना पंख देणारे, स्वप्नांना बळ देणारेआहेत, अशी ही मातापितारूपी संसाररथाची दोन चाकं आहेत. ही दोन्ही शाबूत असणं, फार महत्वाचं आहे. म्हणून ती भक्कम ठेवा. त्यांची काळजी घ्या. त्यांचा आदर करा. त्यांना आनंदी ठेवा. आणि हे सारं, मात्रुदिन, पित्रुदिन साजरे करण्यापुरतंच मर्यादित नको. तर ते कायम असू द्या. त्यांच्या कुपेचा वरदहस्त तर कायम तुमच्या मस्तकावर आहेच.

हरिः ओम्

सौ. शैलजा स. धामणकर-निंबाळकर, B.SC. B.ED. (निवुत्त शिक्षिका-M. K. NAKHAWA HIGH SCHOOL, THANE-MUMBAI.}

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes