आपण दुःखी का होतो?
schedule30 Nov 24 person by visibility 49 categoryमनोरंजन
एकदा शिक्षिकेंनी तिच्या विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकच्या पिशवीतून काही टोमॅटो शाळेमध्ये आणावयास सांगितले. प्रत्येक टोमॅटोवर त्या मुलांनी, ते ज्या व्यक्तीचा द्वेष करत असतील त्याचे नांव लिहून आणावयाचे होते. अशा रीतीने जेवढ्या व्यक्तींचा ते द्वेष करत असतील तेवढेच टोमॅटो त्यांनी आणावयाचे होते.
ठरलेल्या दिवशी सर्व मुलांनी व्यवस्थित नावे टाकलेले त्यांचे टोमॅटो आणले. काहींनी दोन, काहींनी तीन, काहींनी पाच तर काहींनी वीस टोमॅटो, ते द्वेष करीत असलेल्या संख्येबरहुकूम आणले.
शिक्षिकेने नंतर सर्वांना सांगितले की, त्यांना ते टोमॅटो ते जिथे जिथे जातील त्या सर्व ठिकाणी दोन आठवडे बरोबर घेऊन जायचे आहेत. जसजसे दिवस उलटू लागले, तसतसे मुले टोमॅटोंच्या कुजण्याची आणि दुर्गंधीची तक्रार करू लागले. ज्या विद्यार्थ्यांकडे संख्येने जास्त टोमॅटो होते त्यांनी तक्रार केली की त्यांच्याकडची ओझी वाहून नेण्यास अतिशय जड असून दुर्गंधही फारच सुटलेला आहे.
आठवड्यानंतर शिक्षिकेने विद्यार्थ्यांना प्रश्न केला, "तुम्हाला या आठवडाभर कसे वाटले? "
मुलांनी घाणेरड्या वासाबद्दल आणि टोमॅटोंच्या जडपणाबद्दल तक्रारी केल्या. विशेषत: ज्यांनी अनेक टोमॅटो आणले होते.
शिक्षिका म्हणाल्या, "हे अगदी तुम्ही, आपल्या अंत:करणात, तुम्हाला काही न आवडणाऱ्या व्यक्तिंबद्दल द्वेष बाळगता त्याप्रमाणेच तंतोतंत आहे." द्वेषामुळे अंत:करण रोगट बनते आणि तुम्ही तो द्वेष जिथे जिथे जाल तिथे बरोबर घेऊन जाता. "जर तुम्ही टोमॅटोंचा दुर्गंध आठवडाभरासाठी सहन करू शकत नसाल तर कल्पना करा, तुम्ही रोज वागवत असलेल्या कडवटपणाचा तुमच्या अंत:करणावर किती परिणाम होत असेल"
आपल्या दुःखाचे कारण हेच आहे नको त्या वाईट गोष्टी मनात साठवून ठेवतो. अंत:करण ही एक सुंदर बाग आहे. अनावश्यक तण काढून टाकून त्याची नियमीत मशागत करण्याची गरज असते. तुम्हाला क्रोध दिलेल्यांना क्षमा करा. त्यामुळं नवीन चांगल्या गोष्टी साठवण्यासाठी तुमच्या अंत:करणात जागा तयार होईल.
तात्पर्य :*
आपण सर्वजण चांगल्या व्यक्तींबरोबर, चांगल्या विषयांसाठी (कायम) एकत्रित काम करू या. कटुता नव्हे तर काही चांगलं मिळवण्यासाठीच.