Maha Hit 24
Register

जाहिरात

 

सापाला घरापासून लांब ठेवण्यासाठीचे उपाय

schedule17 Jun 24 person by visibility 111 categoryकृषी

भारतीय संस्कृतीत साप या प्राण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदूधर्मात त्याला देव मानून पूजा केली जाते मात्र त्याचवेळी या प्राण्याचं नुसतं नाव घेताच अनेकांच्या जीवाचा थरकाप होतो.

सापाला योग्य तऱ्हेने हाताळणं हे प्रत्येकाचं काम नाही. ते खूप कमी लोकांनाच जमतं. अशा वेळी घरी किंवा आजूबाजूला कुठे साप आढळला तर साहजिकच लोक घाबरतात. साप हा देवासमान मानला जात असल्यामुळे त्याला मारणं अनेकांच्या मनाला पटत नाही. पण ज्या विषारी सापाला माणसं घाबरतात ते साप कशाला घाबरतात तुम्हाला माहिती आहे का? तज्ज्ञांच्या मते काही विशिष्ट वास सापांना सहन होत नाहीत.

डोंगरी भागात, तलाव, बागा किंवा पाणथळ भागातील घरांच्या परिसरात अनेकदा साप निघतात. काही लोक सापाला बघूनच घाबरतात. त्या भीतीपोटी काठी घेऊन त्याला मारायला धावतात. प्रत्यक्षात मानवी वस्ती असलेल्या घरात शिरलेला साप हा स्वतःच खूप घाबरलेला असतो असं तज्ज्ञ सांगतात. अशा वेळी आत्मसंरक्षणार्थ तो आक्रमक होतो. त्यामुळे काही वासांची मदत घेतली तर साप तुमच्या आजूबाजूला फिरकणार नाहीत.

कांदा आणि लसूण या दोन गोष्टी प्रत्येकाच्या घरात असतात. आपल्या आहारात या दोन्ही पदार्थांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कांदा आणि लसणीचा स्वाद असलेले पदार्थ आपण चवीने खातो पण या पदार्थांचा वास सापांना सहन होत नाही. वर्षानुवर्ष भारतीय घरांच्या अंगणात तुळस लावली जाते. पुदीना आणि तुळस या वनस्पतींचे वासही सापांना सहन होत नाहीत.  'ॲज ॲनिमल' या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार 14 प्रकारचे वास सापांना सहन होत नाहीत.

त्यात लिंबाचा रस, व्हिनेगर, दालचिनी या वासांचा समावेश आहे. या गोष्टी एकत्र करुन बनवलेलं तेल घरात शिंपडल्यामुळे साप यायची शक्यता कमी होते. अमोनिया वायूच्या वासाचा त्यांना त्रास होतो. त्यामुळेही ते लांब जातात. सापांना गडबड आणि गोंगाटाचा त्रास होतो. एका संशोधनानुसार साप आपल्या ऐकण्याच्या क्षमतेचा वापर करुन त्यांचं अन्न शोधतात. त्यामुळे गडबड गोंगाटाने त्यांना गोंधळून जायला होतं.

खरं तर साप हा प्राणी शेतकऱ्याचा मित्र असतो असं आपण पुस्तकात वाचत आलो आहोत. अन्नसाखळीत त्याचं महत्त्व विशेष आहे. त्यामुळे त्याला मारु नये. पण त्याची भीती वाटते हे ही खरं आहे. अशा वेळी त्याला पकडून सुरक्षित जागी सोडण्यासाठी सर्पमित्रांची मदत घ्यावी.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes